एकदा हाक मारली की, मुलं रिस्पॉन्स देत नाहीत? ही समस्या सारखी समोर येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही! पुढे जाऊन मुलांमध्ये बधिरत्व येण्याचं ते एक मुख्य कारण असू शकतं. ऐकण्याची क्षमता कमी होण्याची अनेक कारणं आहेत. ती वेळीच ओळखली, तर त्यावर उपाय करणं शक्य आहे. कानाला होणारा संसर्ग रोखला, तर बहिरेपणा कमी करता येऊ शकतो. त्याची लक्षणं कशी ओळखणार? त्यावर उपाय काय? मुलांमध्ये याची लक्षणं काय असतात?
वयोमानाप्रमाणे कमी ऐकू येणं ही सामान्य गोष्ट आहे. त्यावर काही उपचार करता येतात; पण मुलांमध्ये ऐकू न येण्याची समस्या दिसून आली, तर वेळीच हालचाल करावी लागते; नाही तर मुलं ऐकण्याची शक्ती कायमची हरवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ही लक्षणं सहज दिसून येऊ शकतात. एकदा हाक मारली की, प्रतिसाद न देणं, वारंवार सांगावं लागणं, मोठ्या आवाजात बोलणं किंवा टीव्हीचा आवाज मोठा ठेवणं अशा काही लक्षणांवरून मुलांना ऐकू कमी येतंय याची जाणीव होऊ लागते. बरेचदा त्याकडे खास काही नाही म्हणून दुर्लक्ष केलं जातं. मुलांवर ओरडलं जातं किंवा त्यांना ऐकण्याचे सल्ले दिले जातात; पण मुळातच त्यांना कमी ऐकू येत असेल, अशी शंका कमी प्रमाणात घेतली जाते. जन्मजात ऐकण्याची शक्ती कमी असेल, तर त्याची तपासणी मुलाच्या वयाच्या पहिल्या काही महिन्यातच होते. कारण, त्याची वेळोवेळी तपासणी होत असते. मूल प्रतिसाद देत नसेल, तर त्याची कारणं शोधली जातात; पण काही वर्षांनंतर या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. दुर्दैवाने आपल्याकडे मुलांच्या डोळ्यांची आणि कानांची तपासणी वारंवार होत नाही. त्यामुळे त्यात निर्माण झालेला दोष वेळीच ओळखला जाण्याची शक्यता कमी असते.
मुलांमध्ये ऐकू कमी येण्याचं कारण नाक-कान-घसा यांना जोडणार्या नळीत इन्फेक्शन होणं, हे असू शकतं. आपला मध्य कान युस्येशियन ट्युबद्वारा नाकाशी जोडलेला असतो. हीच ट्युब कान आणि घशाला जोडलेली असते. त्यामुळे मध्य कान वातावरणात अचानक झालेला बदल सहन करू शकतो. अचानक एखादा विस्फोट किंवा धमाका झाला, तरी कानाचा पडदा फाटत नाही. कारण, हा दवाब नाकाच्या गुहेद्वारा शोषला जातो; पण याच ट्युबमुळे काही वेळा घसा आणि श्वासनलिकेतील संक्रमण कानात पोहोचवलं जातं. ज्यामुळे लहान मुलांमध्ये ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. काही मुलांमध्ये कमी ऐकू येण्याचा दोष जन्मजात किंवा आनुवंशिक असू शकतो. गर्भावस्थेत आईला डायबेटिस, टॉक्सेमिया असे काही आजार झाले, तर त्यामुळेही हा दोष निर्माण होऊ शकतो. म्हणून, जन्मल्यावर मुलाच्या कानांची तपासणी जरूर करावी. ती इएनटी स्पेशालिस्टकडून केली, तर मशिनच्या मदतीने मुलाच्या मेंदूच्या लहरी तपासून त्यावरून याचा अंदाज बांधता येतो.
मुलांमध्ये ऐकू कमी येण्याचं आणखी एक कारण असू शकतं, ते म्हणजे ती आजारी पडली तर त्यांची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. काही वेळा कांजिण्या, मँजिनायटिस, मेंदूला सूज येणं अशा आजारांमुळे मुलांची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. याशिवाय, डोक्यावर लागलेला मार, जोरात ऐकलेले आवाज यामुळेही त्यावर परिणाम होऊ शकतो. मुलांना कमी ऐकू येतंय हे कसं ओळखायचं याची काही लक्षणं आहेत. मुलं मोठ्या आवाजांना प्रतिसाद देत नसतील तर, तुमच्या हाकेला प्रतिसाद न देणं, सामान्य आवाजापेक्षा उंच स्वरात ऐकणं, कानात सारखी खाज सुटणं किंवा कान चोळणं, वारंवार ताप येणं, कानात दुखणं अशा काही लक्षणांमुळे ऐकण्याची क्षमता कमी असण्याची शक्यता असू शकते. तशी शंका आली तर, त्वरित डॉक्टरांकडून मुलांच्या कानांची तपासणी करायला हवी.
कान दुखणं हे मुलांच्या कमी ऐकू येण्याचं प्रमुख कारण आहे. कान दुखण्याची कारणं अनेक प्रकारची असू शकतात. यात कानाला जखम होणं, कानाच्या पडद्याला भोक पडल्याने दुखणं, कानात फंगस, मळ आदी साचणं, कानात किडा किंवा एखादी वस्तू; उदा., पेन्सिलीचा तुकडा किंवा तत्सम पदार्थ जाणं, काही वेळा उंचावर जाण्याने किंवा विमानात बसल्यावर उच्च हवेचा दाब सहन न झाल्याने कानांत दुखू शकतं. वरीलपैकी कोणत्याही कारणाने कान दुखत असेल तर, त्वरित डॉक्टरांकडून कानांची तपासणी करून घ्यावी. मुलांच्या बाबतीत कानांच्या दुखण्यावर जितक्या लवकर उपचार होतील, तितके त्यातून अन्य धोके निर्माण होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे कानांचे दुखणे किंवा नेहमीपेक्षा कमी ऐकू येणे ही स्थिती धोक्याची मानून त्यावर उपचार करायला हवेत. एकदा ऐकण्याची क्षमता पूर्णपणे गेली की, ती भरून काढणं शक्य होत नाही. म्हणून याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं.
इअर फोन : बहिरेपणाला निमंत्रण
हँडस् फ्रीची मजा आजची मुलं किंवा तरुण पिढी मोठ्या प्रमाणात लुटताना दिसते. बस, ट्रेन किंवा चालतानाही कानांत इअरप्लग घालून सतत काही तरी ऐकत राहणं ही आजकालची फॅशन आहे; पण त्याचा आपल्या कानांवर काय परिणाम होतो, हे माहीत आहे का? एमपीथ्री किंवा आयफोनवर गाणी ऐकण्यार्यांनी हे खास करून लक्षात ठेवायला हवं. जर कोणी व्यक्ती दररोज एका तासापेक्षा जास्त 80 डेसिबलपेक्षा क्षमतेचा आवाज ऐकत राहिला तर, 5 वर्षांत त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. सुरुवातीला कानांच्या पेशींवर तात्पुरते परिणाम दिसतात. नंतर हेच परिणाम कायमस्वरूपी होतात. इअर फोनमुळे नंतर साधारण प्रतीचे आवाज ऐकण्याची क्षमता कमी होते. याशिवाय, इतरही परिणाम होत असतात. चिडचिडेपणा, डिप्रेशन किंवा कानांत कंपण जाणवणं ही त्याची काही लक्षणं आहेत. सुरुवातीला झोप न येणं, चक्कर येणं किंवा डोकं दुखणं अशी लक्षणंही दिसतात. त्यामुळे या हेडफोनच्या मस्तीपासून जरा लांबच राहिलेलं बरं. मुलांनाही त्यापासून लांब ठेवलेलंच बरं!!